बँकेचा इतिहास हा इतिहास नसून आमच्या सन्माननीय ग्राहकांनी व सभासदांनी आम्हाला दिलेली विश्वासाची साथ आहे. …!

मागील ५० वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील इतिहासाकडे नजर टाकली असता, आपणास असे लक्षात येते की, सर्व सामान्य ग्राहक / लघु उद्योजक / व्यापारी यांना बँकिंग विषयक सेवा घ्यावयाची असल्यास बऱ्याच अडचणी होत्या. त्या काळात बँकिंगचा अर्थ म्हणजे ग्रामिण / शहरी भागातून जास्तीत जास्त ठेवी गोळा करणे, आणि काही विशिष्ट वर्गाला / उद्योगधंद्यांना कर्ज स्वरुपात त्यांना पुरवठा करणे म्हणजेच ‘सुरक्षित’ बँकिंग असे मानले जायचे. या धोरणामुळे गरजू लोकांना बँकिंग विषयक सेवा मिळण्यास अनंत अडचणी निर्माण होत असत. हे पोलादी कुंपण तोडण्यासाठी नाशिकमधील काही सेवाभावी व तळमळीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून ११ जून १९५९ रोजी नागपंचमीच्या सुमुर्हतावर नासिक मर्चन्टस बँकेची स्थापना केली. जी बँक जनसामान्यांमध्ये ‘नामको’ ह्या नावाने उदयास आली. सदर बँकेची स्थापना घर नं. ९९, गायधनी वाडा येथे प्रा. एस. जी. पुराणिक आणि कै. विष्णुकाका क्षत्रिय, कै. दादासाहेब पोतनिस, मामासाहेब शुक्ल, प्रभाकरपंत मोडक, गोपाळराव पुराणिक, आण्णासाहेब कुलकर्णी, मु. श. औरंगाबादकर, बाबुभाई राठी, जी. व्ही. अष्टपुत्रे, नारायण क्षत्रिय या सहकार क्षेत्राच्या दिग्गजांच्या हस्ते करण्यात आली.

सन १९५९ ते १९७५ हा कालावधी अतिशय खडतर अवस्थेतून गेला. यानंतर सन १९७५ च्या निवडणुकीमध्ये श्री. हुकुमचंदजी बागमार ज्यांना प्रेमाने "मामासाहेब" ह्या नावाने ओळखतो असे व्यक्तिमत्व निवडून आले. त्यावेळेस बँकेच्या ठेवी ह्या १ कोटी व कर्ज ४३ लाख होते. व त्यानंतरच बँकेच्या अभिमानास्पद वाटचालीस सुरूवात झाली. त्यावेळेस संचालकांनी बँकेच्या हितासाठी व भरभराटीसाठी काही धोरणे ठरविली, ज्या धोरणांमुळे बँकेची घोडदौड वेगाने आजतागायत सुरू आहे.

दिनांक २२ एप्रिल १९९६ रोजी बँकेस रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा दर्जा बहाल केला. त्याप्रमाणे दिनांक २५ ऑक्टोबर २००० रोजी बँकेस मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे बँकेने राज्याबाहेर आंध्र प्रदेश राज्यात हैद्राबाद येथे व गुजरात राज्यात सुरत येथे शाखा उघडल्या. आजमितीस बँकेच्या ठेवी रुपये १५०२.१२ कोटी, कर्ज रुपये ९१३.०९ कोटी इतके आहे. आज बँकेच्य ८० शाखा कोअर बँकींग प्रणाली अंतर्गत जोडल्या गेलेल्या आहेत व बँकेच्या ग्राहकांना आपले दैनंदिन व्यवहार करणे सुलभ झाले आहे.

बँकेची अभिमानास्पद वाटचाल :

सध्याचे माहिती व तंत्रज्ञानाचे युग पाहता आपणास असे लक्षात येते की, भारतातील सुमारे ५०० अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी २५ टक्के सॉफ्टवेअर कंपन्या या महाराष्ट्रात आहेत. व सुमारे ४० टक्के जनता ही सॉफ्टवेअरचा वापर करते. यामध्ये ग्रामिण व शहरी भागाचा देखिल समावेश आहे. ह्या बाबी लक्षात घेता बँकेने मार्च २००७ मध्ये कोअर बँकींग प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. कारण माहिती व तंत्रज्ञानाची मदत घेवुनच कुठलीही बँक ह्या क्षेत्रात पाय रोवून उभी राहू शकते.

बँकेचे कर्मचारी व अधिकारी ह्यांना यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित केले जाते. ज्याद्वारे त्यांना ग्राहकांना अधिकाधिक सुविधा चांगल्या प्रकारे देण्यास मदत होते. याचाच परिपाक म्हणून स्वमालकीचे अत्याधुनिक डेटा सेंटर असलेली संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून दि. नासिक मर्चन्टस को-ऑप. बँक लि., नाशिक गणली जाते.

बँक फक्‍त बँकिंग व्यवहार न करता समाजाप्रती असलेले आपले देणे हे विविध प्रकारे सामाजिक योजना राबवून दाखविलेले आहे. उदाहरण द्यावयाचे झाले तर नामको चॅरिटेबल ट्रस्ट, कॅन्सर हॉस्पिटल, पुरग्रस्तांना केलेली पाच लाखाची मदत इत्यादी व अशी अनेक उदाहरणे देता येतील. या ५२ व्या वर्षाच्या वाटचालीमध्ये आमच्या ग्राहकांचा व सभासदांचा हा मोलाचा वाटा आहे हे येथे नमूद करावेसे वाटते. अशाच प्रकारचे सहकार्य यापुढेही राहील याची आम्हांला केवळ आशाच नाही तर खात्री आहे.

Quick Links

ठेव योजना

Copyright © namco-bank. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.